PMPML : पीएमपीएमएल प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; उद्यापासून पुन्हा सुरु होणार वन डे पास

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि ग्रामीण भागात बस सेवा सुरू केली आहे. परंतु एसटी च्या तिकिटपेक्षा दर कमी असल्यामुळे PMPML चे उत्पन्न कमी होत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील डेली पास ७० रुपये आणि मासिक पास १४०० रुपये १ एप्रिल पासून बंद करण्यात आला होता. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील नोकरदार वर्ग, महिला आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी पूर्वीप्रमाणेच डेली व मासिक पास सुरू करावा अशी मागणी करत होते. या मागण्यांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर, संचालक मंडळाच्या बैठकीत ४ सप्टेंबर २०२३ पासून पीएमपीएमएल पास सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय PMPML चे अध्यक्ष व व्वस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी घेतला आहे. 

PMPML, Daily Pass, Monthly pass
PMPML

यापूर्वी पास सेवा पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेपुरती मर्यादित होती. प्रवाशांना आता सर्व मार्गांवर पास सेवेचा लाभ घेता येईल. पीएमपीएमएल बसेस च्या भाड्यात थोडासा बदल केल्याने, वन डे पासची किंमत १२० रुपये असेल तर मासिक पासची किंमत पीएमपीएमएलच्या संपूर्ण क्षेत्रासाठी २७०० रुपये असेल.

सध्या, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत वन डे पासची किंमत ४० रुपये आहे, तर मासिक पासची किंमत ९०० रुपये आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांसाठी, प्रवाशांना वन डे पाससाठी ५० रुपये आणि मासिक पाससाठी १२०० रुपये मोजावे लागतात या दरामध्ये कोणताही बदल न करता पूर्वीप्रमाणेच ठेवले आहे.

 मासिक पास मिळविण्यासाठी, प्रवाशांनी त्यांच्या आधार कार्डच्या छायाप्रतीसह जवळच्या परिवहन महामंडळ पास केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी प्रवासी ओळखपत्र तयार करण्यासाठी पासपोर्ट-आकाराचा फोटो प्रदान करणे आवश्यक आहे. वन डे पाससाठी, प्रवासी बस कंडक्टरला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणताही एक ओळख पत्र पुरावा  दाखवू शकतात.

प्रवाशांनी खासगी वाहनांचा वापर कमीत कमी करून वनडे पास व मासिक पासचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या